पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी   

मुंबई,(प्रतिनिधी) : राज्यात मोठ्या प्रमाणात कुत्रे,मांजरे,गौवंशीय प्राणी आदी पाळीव प्राणी घरात पाळले जातात. मात्र त्यांची वयोमर्यादा कमी असते. त्यांच्या म़ृत्यूनंतर त्यांचे शव अशाच प्रकारे खाडी, तलाव, मोकळ्या जागा आदी ठिकाणी फेकले जाते. यामुळे दुर्गंधीबरोबरच रोगराई पसरण्याचाही धोका असतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारची जागा पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. नगरविकास विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

शुल्क आकारणार

राज्यातील सर्व महापालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारची जागा पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करून दयावी लागणार आहे. देण्यात येणार्‍या जागेस संरक्षक भिंत तसेच सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागणार आहे. प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी ठराविक शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.
 

Related Articles